राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी अजित पवार गट हायकोर्टात
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी केलेल्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी फेटाळल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने आता मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तिथे नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. वास्तविक नार्वेकरांनी अजित पवार यांचा गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला आहे.
41 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाने केला होता. याशिवाय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय देऊन अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र असल्याचे शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केले होते. नार्वेकरांच्या त्या निर्णयालाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शरद पवार गटाच्या सर्व आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. आता उच्च न्यायालय कसा निर्णय घेते, त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.