Ajit Pawar Ncp : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मोठ्या साहेबांवरच श्रद्धा; अजितदादा अमळनेरच्या राजभवनातून रिकाम्या हाती परतले !
Ajit Pawar Ncp : अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी वर्षभराच्या दुराव्यानंतर जळगावात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित शरद पवार गटाच्या मेळाव्यात काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी साहेबराव पाटलांना पाडळसरे धरणाचा आणि जुन्या दोस्तीचा वास्ता देऊन भावनिक साद घालून पाहिली. अजितदादांनी स्वतः सोमवारी (ता.१२ ऑगस्ट) अमळनेरातील राजभवनाचे दार ठोठावले. मात्र, मोठ्या साहेबांवर श्रद्धा ठेवून असलेल्या साहेबराव पाटलांनी अजितदादांना अजिबात दाद दिली नाही.
Ajit Pawar Ncp : Krishibhushan Sahebrao Patil’s faith in elder Saheb; Ajit Dada returned empty handed from Raj Bhavan!
जळगावातील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात अमळनेर मतदारसंघासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांचे नाव सर्वांत पुढे होते. मात्र, मतदारसंघातून डॉ. बी.एस. पाटील, तिलोत्तमा पाटील आणि गिरीश निकम यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे साहेबराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे लक्षात आले. शरद पवार गटाशी जाहीर मनोमिलन झाल्यानंतरही साहेबराव पाटील यांची निराशा काहीशी कायमच राहिली. हीच संधी साधून गरम लोखंडावर घाव घालण्यासाठी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील थेट पारोळा तालुक्यातील राजवडला पोहोचले. निमित्त साहेबराव पाटलांच्या पत्नी व अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस होते, पण त्यांना मनधरणी करून साहेबराव पाटलांना शरद पवारांकडे जाण्यापासून रोखायचे होते.
साहेबराव पाटलांची मानसिक स्थिती काही दिवस झाली होती दोलायमान
दरम्यान, मंत्री अनिल पाटील भेटून गेल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांची मानसिक स्थिती काही दिवस दोलायमान झाल्याचा प्रत्यय त्यांच्या वक्तव्यावरून आला होता. प्रसार माध्यमांशी बोलताना साहेबराव पाटलांनी मंत्री अनिल पाटलांच्या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र, क्रांती दिनी (ता.९ ऑगस्ट) आपण पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत, अशी गुगली टाकण्यासही ते विसरले नव्हते. साहेबराव पाटलांचे तळ्यातमळ्यात सुरू झाल्याचे पाहुन आपला तीर बरोबर निशाण्यावर लागल्याचा आनंद मंत्री अनिल पाटील यांनाही झाला होता. अजितदादा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यात आल्यावर साहेबराव पाटलांना व्यासपीठावर आणून मोठा गेम करण्याचा इरादा मंत्री पाटील यांचा होता, असे सांगितले जात होते. त्यादृष्टीने त्यांनी सर्व तयारी सुद्धा करून ठेवली होती.
साहेबराव पाटील अजितदादांच्या गळाला लागलेच नाही
मंत्री अनिल पाटील भेटून गेल्यानंतर साहेबराव पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटासोबत राहतील. त्याचा मोठा फायदा अनिल पाटील यांना होईल, असा कयास अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात कार्यकर्त्यांनी दिलेला सबुरीचा सल्ला शिरसावंद्य मानून माजी आमदार पाटील यांनी मोठ्या साहेबांवर म्हणजेच शरद पवारांवर श्रद्धा कायम ठेवली. अजितदादांच्या दौऱ्याच्या दिवशी नेमके अमळनेरमध्ये न थांबता त्यांनी कल्टी मारली. त्यांचा साधा फोन त्यांनी दिवसभर घेतला नाही. त्यामुळे अजितदादा व मंत्री अनिल पाटील यांची मोठा निराशा झाली. मोठा मोहरा हातातून निसटल्याचे दुःख घेऊनच अजितदादा अमळनेरहून माघारी फिरले.