अजित पवारांना मोठा धक्का…राष्ट्रवादीचा एक मंत्री भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत ?

जळगाव जिल्ह्याशी आहे त्यांचा संबंध

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाची चिंता वाढली आहे. महायुतीच्या सरकारमध्येही त्यांना अलिकडे दुय्यम वागणूक मिळू लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर यापुढील काळात राज्यामध्ये ट्रीपल नव्हे तर डबल इंजिन सरकार असणार असल्याचे स्पष्टच केले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अजित पवार गटात भवितव्य न राहिल्याने एक मंत्री भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट एका माजी मंत्र्याने आज जळगावात केला आहे. ( Ajit Pawar Ncp )

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अनेक आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अमळनेरमधील एकमेव आमदार अनिल पाटील हे देखील होते. त्याची बक्षिसी म्हणून नंतर पाटील यांना महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मदत व पुनर्वसन मंत्रीपद सुद्धा देण्यात आले. मंत्री पाटील यांच्या रूपाने अमळनेर तालुक्याला देखील कधी नव्हे तो मंत्रीपदाचा बहुमान मिळाला.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच जागांवर निवडणूक लढवली. मात्र, जेमतेम एकाच जागेवर त्यांचा उमेदवार विजयी झाला. खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत पराभव झाला. इतके सगळे घडल्यानंतर साहजिक अजित पवारांची मान आता खाली गेली आहे. महायुतीकडुनही त्यांची हेटाळणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अजित पवार गटाला सोबत घ्यायचे किंवा नाही, त्याबद्दलही भाजपच्या गोटाकडून चाचपणी केली जात आहे.

अशा या परिस्थितीत चव सांभाळून घेण्याच्या उद्देशाने अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे विधान शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी जळगावात केले आहे. त्यांच्या त्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील हे पूर्वी भाजपमध्येच होते. त्यामुळे त्यांचे भाजपच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्याचाच वापर करून ते आता भाजपमध्ये घरवापसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील यांची दिल्लीत भेट घेतल्याचा दावा सुद्धा डॉ.सतीश पाटील यांनी केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button