“जो माणूस पक्ष सोडून दुसरीकडे जातो, त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते”
-भाजपचे प्रदेश सह मुख्यप्रवक्ता अजित चव्हाण यांची उन्मेश पाटलांवर टीका
Ajit Chavan | “कार्यकर्त्यांनी ज्यांना रक्ताचे पाणी करून आमदार व खासदार केले, तेच उन्मेश पाटील आज भारतीय जनता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. जनता त्यांना नक्कीच धडा शिकविणार आहे. जो माणूस पक्ष सोडून जातो, त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते. त्यामुळे बऱ्याचवेळा सोडलेल्या पक्षावर आरोप देखील केले जातात. प्रत्यक्षात तो सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सह मुख्यप्रवक्ता अजित चव्हाण यांनी येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून बूथ विजय अभियान राज्यात राबविले जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी गुरुवारी (ता.04) जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी श्री. चव्हाण हे बोलत होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख विशाल त्रिपाठी तसेच दीपक सूर्यवंशी, महेश जोशी तसेच उदय भालेराव, जितेंद्र पाटील, मनोज भांडारकर, धीरज वर्मा, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
उमेदवारी मिळाली नाही म्हणून लगेच पक्षाची साथ सोडली
“भाजप नेते गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटलांसारख्या सामान्य कार्यकर्त्यांला वर उचलले तसेच घडविले, पक्षातील पदे दिली आणि मोठे केले. त्या नेत्याची साथ सोडून उन्मेश पाटील हे आता दुसऱ्या पक्षात गेले आहेत. कुटुंब सोडून गेल्यानंतर एखाद्या मुलाचे जसे हाल होतात, तशी अवस्था त्यांची एक दिवस होणार आहे. उन्मेश पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून लगेच भारतीय जनता पक्षाची साथ सोडली. स्मिता वाघ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उत्तम उदाहरणे आहेत, ज्यांनी वाट पाहिली तसेच संयम राखला म्हणून पक्षाने नंतर त्यांना नेतृत्वाची संधी देखील दिली,” असेही अजित चव्हाण यांनी स्पष्ट केले.