व्हीलचेअर वेळेवर न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू, एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस
Air India : मुंबई येथील विमानतळावर व्हीलचेअर वेळेवर न मिळाल्यामुळे एका प्रवाशाचा कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कारणामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नोटीस जारी करून, प्रवाशाच्या मृत्युला जबाबदार धरून एअर इंडियाला सात दिवसांत उत्तर देण्यास आदेश दिले आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला विमान नियम 1937 चे पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, व्हीलचेअर वेळेवर न मिळाल्यामुळे एका प्रवाशाचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर विमान कंपन्यांनी दिव्यांग व्यक्ती आणि चालण्याची क्षमता नसलेल्या प्रवाशांना विमानतळावर आल्यापासून प्रवास संपेपर्यंत मदत करावी, असे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिले आहेत. दिव्यांग प्रवाशांना विमानात बसताना किंवा उतरताना त्यांच्यासाठी पुरेशा संख्येने व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.