दिल्लीत हालचाली…राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न मार्गी लागणार !

पाशा पटेल यांनी घेतली पियूष गोयल यांची भेट

जळगाव टुडे । कांदा, कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे हतबल झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कृषी मूल्य आयोग व टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. शेतीमालाचे आयात व निर्यात धोरण आणि आयात शुल्काविषयी ठोस निर्णय घेण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही त्यानंतर केंद्रीय मंत्री श्री.गोयल यांनी दिली. ( Agriculture News )

Agriculture News
सन २०२१ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रामध्ये कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये खूप मोठे चढ-उतार झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पाशा पटेल यांच्या बैठकीचे नियोजन केले होते. त्यात सहभागी झाल्यानंतर पाशा पटेल यांनी कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी आकडेवारी निशी पियुष गोयल यांची भेट घेऊन विस्तृतपणे मांडल्या. यावेळी पाशा पटेल यांनी मंत्री गोयल यांना पर्यावरण संतुलित इको फ्रेंडली बांबूपासून निर्मित श्री गणेशाची मूर्ती देखील भेट दिली.

शेतकऱ्यांच्या संबंधित शेतमालाचे आयात निर्यात धोरण आणि आयात शुल्क याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करून या विषयांवर ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पाशा पटेल यांना सांगितले. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सगळ्या शेती प्रश्नांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या १५ दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button