रावेर तालुक्यातील केळी बागांचे नैसर्गिक आपत्तीने सुमारे ५१ कोटी रूपयांचे नुकसान !

जळगाव । जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण ४४ गावातील शेतकऱ्यांना सुमारे १,१४६ हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान झाल्याने तब्बल ५१ कोटी ३ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांना आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची आस लागली आहे. ( Agriculture News )

अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे केळी बागांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करताना झाडांची संख्या मोजली जाते. त्यातही बागेतील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झाडे जमिनदोस्त झाल्याचे आढळले तरच नुकसान ग्राह्य धरले जाते आणि त्यानुसार पंचनामा करून अहवाल सादर केला तरच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविले जाते. याअनुषंगाने रावेर तालुक्यात ०१ ते ३१ मे २०२४ या कालावधीत वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले होते. त्यात १,१४८ हेक्टरवरील केळी बागांची अतोनात हानी झाल्याचे निदर्शनास देखील आले होते.

गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप नाही
दरम्यान, केळी बागांच्या नुकसानीची नोंद घेऊन शासनाकडून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाते. मात्र, संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या बाबतीत नेहमीच चालढकल केली जाते. हा अनुभव केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षीही आला होता. सन २०२२-२३ मध्ये झालेच्या केळी बागांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसून, त्याबद्दल कोणीच काही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. शासनाने एक प्रकारे केळी उत्पादक शेतकऱ्यांची त्यामाध्यमातून थट्टाच चालवली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button