हमीभावात तुटपुंजी वाढ; सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने !
जळगाव । विविध कारणांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याने आधीच शेती दिवसेंदिवस तोट्यात जाऊ लागली आहे. त्यात यंदाच्या खरिपासाठी केंद्र सरकारकडून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या हमीभावात खूपच कमी वाढ जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमधून त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसुनही सरकारने शेतीमालाचे हमीभाव वाढविण्यासाठी खास प्रयत्न केलेले नाहीत, याबद्दल सखेद आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. ( Agriculture News )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीने केंद्रीय कृषिमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता तरी शेतीला चांगले दिवस येतील, अशी आशा देशातील शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात येरे माझ्या मागल्या म्हणत, सरकारने यंदाही विविध शेतीपिकांच्या हमीभावात नाममात्र वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने मध्यम धागा व लांब धागा कापसाच्या हमीभावात जेमतेम ५०१ रूपयांची वाढ केली आहे. वास्तविक कापूस उत्पादकांना हमीभावात किमान १५०० रूपये होण्याची आशा होती. हाच अनुभव सोयाबीनच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांना आलेला आहे. सोयाबीनचे भाव सुमारे ६००० रूपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची अपेक्षा होती, प्रत्यक्षात सरकारने फक्त 292 रूपयांची वाढ हमीभावात केल्याचे उघड झाले आहे. मक्याच्या हमीभावातही जेमतेम १३५ रूपयांची वाढ झालेली आहे. कडधान्य व तेलबिया पिकांच्या बाबतीत देखील हमीभावातील वाढ समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
पीकनिहाय हमीभावाची स्थिती (कंसात पूर्वीचे दर)
● कापूस मध्यम धागा- ७१२१ (६६२०) रूपये
● कापूस लांब धागा- ७५२१ (७०२०) रूपये
● सोयाबीन- ४८९२ (४६००) रूपये
● तूर- ७५५० (७०००) रूपये
● मूग- ८६८२ (८५५८) रूपये
● उडीद- ७४०० (६९५०) रूपये
● मका- २२२५ (२०९०) रूपये
● ज्वारी हायब्रीड- ३३७१ (३१८०) रूपये
● ज्वारी मालदांडी- ३४२१ (३२२५) रूपये
● बाजरी- २६२५ (२५००) रूपये
● रागी- ४२९० (३८४६) रूपये
● भात साधारण- २३०० (२१८३) रूपये
● भात ए ग्रेड- २३२० (२२०३) रूपये
● भुईमूग- ६७८३ (६३७७) रूपये
● सूर्यफुल- ७२८० (६७६०) रूपये
● तीळ- ९२६७ (८६३५) रूपये
● कारळे- ८७१७ (७७३४) रूपये