माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील केळी पीकविमा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव टुडे । जिल्ह्यातील प्रलंबित पीकविमा नुकसान भरपाई व जिल्हा बँकेच्या विषयासंदर्भात माजी खासदार उन्मेश पाटील तसेच पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील-पवार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नुकतीच भेट घेतली. ((Agriculture News) दोघांनी कापूस, केळी, मोसंबी, लिंबू पिकांच्या प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करून ते तात्काळ वर्ग करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे फळ पीकविमा योजनेअंतर्गत चालू वर्षात एप्रिल तसेच मे महिन्यातील 42 अंश सेल्सिअस आणि 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या निकषात 75 टक्के पेक्षा जास्त महसूल मंडळ पात्र झाली आहेत, त्यांचे देखील दावे तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली.
30 मे 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023 अंतर्गत 4 लाख 55 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांचा विमा काढला होता. संबंधित शेतकऱ्यांना वैयक्तिक झालेल्या नुकसानाची भरपाई व उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली नाही. खरीप हंगाम 2024 ला सुरुवात होत असून, अजूनपर्यंत या विषयाचा निर्णय लागला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरी आपण तात्काळ या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 30 मे 2024 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीस आदेशित करणे बाबतची कार्यवाही करावी, असे माजी उन्मेश पाटील व करण पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून केळी पीकविम्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा
जळगाव जिल्हात हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत (केळी विमा) सन 2023 मधील 11,300 केळी उत्पादक शेतकरी ज्यांचे क्षेत्र कमी जास्त होते आणि 6,700 शेतकरी ज्यांनी केळी लागवड केली असल्याबाबत जिल्हास्तरीय पिक विमा तक्रार निवारण समितीने मान्यता दिली होती, अशा सर्व शेतकऱ्यांची केळी पिक विम्याची नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित आहे. याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन सूचना देऊन कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तरी या विषयात तात्काळ आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून केळी पीकविम्याचा प्रश्न निकाली काढावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
मोसंबी व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे पीकविमा दावे मंजूर करण्यात आलेले नाही
हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मोसंबी व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. परंतु आजपर्यंत त्यांचे विमा क्लेम सेटल करण्यात आलेले नसून नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना देखील तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपनीस आदेशित करावे. हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत सन 2024-25 अंतर्गत केळी, मोसंबी व लिंबू या पिकांचा पडताळणीचा कालावधी पूर्ण झालेला असून तात्काळ सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत विमा कंपनीस आदेशित करावे. हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना सन 2024-25 अंतर्गत केळी, मोसंबी व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी कमी तापमान व जास्त तापमान (एप्रिल व मे 2024 ) या निकषामध्ये 75% पेक्षा जास्त महसूल मंडळ पात्र झालेले आहेत. संबंधित सर्व पात्र शेतकऱ्यांचे विमा क्लेम तात्काळ मंजूर करून नुकसान भरपाई देणेबाबत संबंधित विमा कंपनीस आदेशीत करावे, असेही माजी खासदार पाटील व करण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.