कमी दिवसात जास्त पैसा देणाऱ्या उन्हाळी कोथिंबि‍रीची लागवड ठरू शकते फायदेशीर !

जळगाव टुडे । (Agricultural Consultancy) कोथिंबिरीची लागवड अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर करता येते. मात्र, उन्‍हाळ्यात तापमान 36 अंश सेल्सिअसच्‍या वर गेल्‍यास कोथिंबिरीची वाढ कमी होते. कोथिंबिरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमिन निवडावी. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत देखील कोथिंबिरीची पीक चांगले येते, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्‍यात केली जाते. विशिष्‍ट स्‍वादयुक्‍त पानांसाठी कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते. कोथिंबिरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. उन्‍हाळी हंगामात कोथिंबिरीची उत्‍पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्‍वाची पालेभाजी आहे. भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्‍ये कोथिंबिरीचा वापर सर्रासपणे करण्‍यात येतो.

लागवडीचा हंगाम
कोथिंबिरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात. उन्‍हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबिरीचे उत्‍पादन घेता येते.

हिरवीगार कोथिंबीर

कोथिंबीर लागवडीची पध्‍दती
कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करून 3×2 मिटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे. प्रत्‍येक वाफयात 8 ते 10 किलो चांगली कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्‍यावे. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे. बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. तणांचा प्रार्दुभाव जास्‍त प्रमाणात होत असल्‍यास सपाट वाफ्यामध्‍ये 15 ते 20 सेमी अंतरावर खुरप्‍याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्‍यावे. उन्‍हाळी हंगामात पेरणीपुर्वी वाफे चांगले भिजवून घ्‍यावे. वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे. कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 60 ते 80 किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्‍यांवर चांगली उगवण होण्‍यासाठी प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळया कराव्‍यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी धन्‍याचे बी 12 तास पाण्‍यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्‍यामुळे उगवण 15 ते 20 दिवसा ऐवजी 8 ते 10 दिवसात होवून कोथिंबिरीच्या उत्‍पादनात वाढ होते आणि काढणी लवकर होण्‍यास मदत होते.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन
कोथिंबिरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी 35 ते 40 गाडया शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबिरीच्या पिकाला पेरणीच्‍या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्यावे. बी उगवून आल्‍यावर 20-25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीचा खोडवा घ्‍यावयाचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे. सुरूवातीच्‍या काळात बियांची उगवण होण्‍यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्याच्‍या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे.

काढणी उत्‍पादन आणि विक्री
पेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबिरीला फुले येण्‍यास सुरुवात होते. त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी. साधारणपणे 15 ते 20 सेमी उंच वाढलेली परंतु फुले येण्‍यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी. नंतर कोथिंबिरीच्‍या जुड्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांमध्‍ये व्‍यवस्‍थीत रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. पावसाळी आणि हिवाळी हंगामात कोथिंबिरीचे हेक्‍टरी 10 ते 15 टन उत्‍पादन मिळते, तर उन्‍हाळी हंगामात 6 ते 8 टन उत्‍पादन मिळते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button