Accident News : जळगाव शहरातील महामार्गावर भरधाव कारने धडक दिल्याने ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू…!
Accident News : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाहीए. तीन दिवसांपूर्वी तरुणीसह एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना ताजी असतानाच, आज शनिवारी आणखी एक गंभीर अपघात झाला आहे. भरधाव कारने ७८ वर्षीय अजबसिंग नारायण पाटील (रा. द्वारका नगर, जळगाव) यांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर आहुजानगर परिसरातील संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.
Accident News : An old man died after being hit by a speeding car on the highway in Jalgaon city…!
अजबसिंग पाटील हे द्वारकानगरात त्यांच्या मुलीच्या घरी राहत होते, तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील आपल्या कुटुंबासह यावल तालुक्यात गावी शेती कामासाठी वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अजबसिंग पाटील द्वारकानगर स्टॉपजवळील झाडाखाली असलेल्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगावहून एरंडोलकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जळगाव शहरातून जाणारा महामार्ग मृत्युचा महामार्ग बनल्याने संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचे काम शुक्रवारी महाविकास आघाडीने केले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसह शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने त्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढून आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन देखील केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बरेचजण रस्त्यावर उतरून परत आंदोलन करण्याच्या तयारीत देखील आहेत.