नंदुरबारमध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात गर्भवती महिला जागीच ठार !
जळगाव टुडे । खडीने भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर गर्भवती महिलेचा डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात नंदुरबार शहरात घडला असून, कवा पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात तिचा पती सुद्धा किरकोळ जखमी झाला आहे. संबंधित ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ( Accident News )
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरालगतच्या करण चौफुलीवर बाजारासाठी मोटरसायकलवर जात असलेला दांपत्याला खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत महिला खाली पडली आणि तिच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी मृत महिलेच्या पतीने मोठा आक्रोश केला. नागरिकांनी त्यास धीर देण्याचा प्रयत्न केला.
अपघातानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करून संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नंदुरबार शहरालगतच्या करण चौफुली नजीक दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.