कालव्यात अल्टो कार पडली; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू !

जळगाव टुडे । चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर भरधाव अल्टो कार कालव्यात जाऊन पडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.28) मध्यरात्री घडली आहे. रात्री उशिरा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असताना सदरचा अपघात झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. (Accident News)

सदरचा भीषण अपघात हा सांगली जिल्ह्यातील तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एस.एस.मंगल कार्यालयाजवळ घडला आहे. त्यात तासगाव येथील सिव्हिल इंजिनीअर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पाचही मृतदेह तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंचनामा केला जाणार आहे.

खोल कालव्यात कोसळलेल्या अल्टो कारचा पार चेंदामेंदा झाला आहे. उंचावरून भरधाव कार (एमएच 10- एएन/1497) खाली कोसळल्यानंतर आतमध्ये बसलेल्या पाटील कुटुंबियांना कोणतीच हालचाल करता आली नाही. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. बुधवारी सकाळी अपघाताचे दृश्य पाहुन अनेकांचा थरकाप उडाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button