भडगावला भावाकडे वास्तुशांतीसाठी आलेल्या नाशिकच्या महिलेचा मुलगा व मुलीसह अपघाती मृत्यू !
जळगाव टुडे । जिल्ह्यातील भडगाव शहरात राहणाऱ्या भावाच्या घराची वास्तुशांती आटोपून नाशिककडे कारने निघालेल्या महिलेचा मुलगा व मुलीसह बसने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. वंदना संतोष ललवाडे (वय 40), शुभम संतोष ललवाडे (वय 20), निकिता मनोज शिंदे (वय 22), अशी मृतांची नावे असून, त्यांच्यासोबतचा तीन वर्षीय बालक बचावला आहे. मात्र, त्याचीही तब्बेत गंभीर आहे. (Accident News)
भडगाव शहरात राहणाऱ्या विश्वनाथ फकिरा पाटील यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी नाशिक येथील रहिवासी असलेल्या वंदना संतोष ललवाडे, शुभम संतोष ललवाडे, निकिता मनोज शिंदे आणि तीन वर्षीय बालक हे सर्व कार (क्र. एमएच/15 /सीडी/2057) ने घराकडे परतीच्या प्रवासाला निघाले होते. सकाळी साधारण 11 वाजेच्या सुमारास नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी गावाजवळील हॉटेल तेजस नजिक चाळीसगाव -मनमाड बस (एमएच./14/बी.टी/ 4498) त्यांच्या कारला धडकली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. त्यास उपचारार्थ मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बसच्या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील मृतदेह बाहेर काढणे मुश्किल झाले होते.