जळगावमधील केमिकल कंपनीत स्फोट; पाचव्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
Jalgaon Today : जळगावच्या औद्योगिक वसाहतीत मोरया केमिकल कंपनीला बुधवारी (ता.17) लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात एकूण 24 कामगार जखमी होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात उपचार घेणाऱ्या आणखी एका कामगाराचा मंगळवारी (ता.23) मृत्यू झाला असून, स्फोटातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे. मंगळवारी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव सचिन चौधरी असे आहे. Accident News
मोरया कंपनीला लागलेल्या आगीत समाधान पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा या चौघांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमींपैकी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारा सचिन चौधरी हा कामगार छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. सचिन चौधरी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मोरया कंपनीत गेल्या सात वर्षांपासून तो काम करीत होता. त्याच्यावर अवलंबून असलेल्या परिवारावर शोककळा पसरली आहे. Accident News
स्फोटाच्या घटनेनंतर कंपनीचे मालक अरूण निंबाळकर तसेच व्यवस्थापक लोमेश रायगडे हे कारागृहात आहेत. त्यामुळे केमिकल कंपनीच्या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च हा त्यांच्या नातेवाईकांनाच करावा लागत आहे. त्याअनुषंगाने कंपनीच्या प्रशासनाने कामगारांच्या उपचाराचा खर्च उचलावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही देखील सुरू आहे.