लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या क्रुझरची लक्झरी बसला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू
Accident News : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या क्रुझरने लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे सात जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.17) रात्री जांभुळवाडी (ता.कवठेमहंकाळ) फाट्यावर घडली. मृतात कर्नाटकातील जमखंडी येथून सावर्डे (ता.तासगाव, जि.सांगली) येथे लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींचा समावेश आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर क्रुझरच्या पुढील भागाने पेट घेतल्याचे लक्षात येताच आजुबाजुच्या रहिवाशांनी पाणी आणून आग आटोक्यात आणली.
अपघात झालेल्या क्रुझरमध्ये तब्बल 17 प्रवासी होते, जे तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाकडे लग्नासाठी चालले होते. सोबत चार ते पाच गाड्या होत्या, त्यातील एका गाडीचा भीषण अपघात झाल्याने लग्न कार्यावर शोककळा पसरली. बुधवारी रात्री साधारण साडेसात वाजेच्या सुमारास जांभुळवाडी फाट्याजवळच एका ढाब्यापासून काही अंतरावर मुंबईकडे जाणाऱ्या तिरूपती नावाच्या लक्झरी बसला लग्न कार्यासाठी निघालेल्या वऱ्हाडींच्या गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात वऱ्हाडींची गाडी थेट लक्झरीच्या खाली शिरल्याने सात वऱ्हाडी जागीच ठार झाले. दरम्यान, अपघातातील अन्य जखमींना तातडीने कवठेमहंकाळच्या उपजिल्हा रूग्णालयात तसेच जत व मिरजच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवठेमहंकाळला रवाना करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नव्हती. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या सदरच्या अपघाताचे दृश्य पाहुन अनेकांनी हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी तातडीने हजेरी लावून जतचे पोलिस निरीक्षक सुरज बिजली व त्यांच्या पथकाने बचाव कार्याला वेग दिला होता.