जळगाव तालुक्यात रामदेववाडी नजिक भीषण अपघातात दोन बालकांसह आईचा मृत्यू

जळगाव टुडे | तालुक्यातील रामदेववाडी गावानजिक मंगळवारी (ता.07) झालेल्या भीषण अपघातात महिलेसह दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोमेश सरदार चव्हाण (वय ०२), सोहन सरदार चव्हाण (वय ०७), सर्व रा. शिरसोली असे मृतांची नावे आहेत.

राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. रामदेववाडी गावाच्या बाहेर आल्यावर समोरून आलेल्या भरधाव कारने (एम एच १९ सी.व्ही. ६७६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकले गेले. त्यात राणी चव्हाण व सोमेश यांचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाला. तसेच डोक्याला मार लागल्याने सोहन याचा देखील मृत्यू झाला.

A mother with two children died in a terrible accident

घटनास्थळी अपघात झाल्याची माहिती मिळताच जमावाने रास्ता रोको केला. या ठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव संतप्त झालेला होता. यामुळे चार तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच पडून होता. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळाले. या दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे उमेश ज्ञानोबा गायकवाड आणि एक महिला पोलीस जखमी झाले आहे. दरम्यान, दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button